May 16th to 31st, 2022

केरळ मधिल विकास लिंगभाव आणि उच्च शिक्षण: वास्तव आणि विसंगती.

लिंगभाव समानता आणि उच्च शिक्षण ह्या प्रकल्पा अंतर्गत मी डिसेंबर २०२१ आणि मार्च २०२२ मध्ये दोनदा केरळला जावून आले. मी स्वतः केरळचीच आहेत्यामुळे हा प्रवास आणि तिथले काम हे दोन्ही मला व्यक्तीगत पातळीवर खुप वेगळा अनुभव देवून गेले. मी संशोधक म्हणून आणि एक आई म्हणून प्रथमचप्रवास करणार होते. त्यामुळे मला खूप वेगवगळ्या प्रकरची व्यवस्था करायला लागली ज्यामध्ये फक्त माझी मुलगी, मी स्वतः आई म्हणून आणि तिचे आजी आजोबा ह्यांची मानसिक तयारी एवढेच नव्हते तर माझ्या अनुपस्थितीत इतर ज्या गोष्टी करायला लागतील त्याचा पण विचार मी करत होते. केरळला जाताना मी विद्यार्थ्यांना भेटीन त्यांचे अनुभव समजून घेईन आणि त्यातून केरळ मधील उच्च शिक्षणाविषयी थोडी माहिती मिळेल ह्याचा मला अंदाज होता. ह्या लेखात मी केरळ मधील उच्च शिक्षणातील स्त्रिया आणि त्यांचा त्यासाठीचा संघर्ष ह्या विषयी मी एकूणच केरळ मधील स्त्रियांचे स्थान ह्या भोवतीच्या गुंतागुंतीच्या वास्तवाची चर्चा करणार आहे.

केरळ हे ९३.१% साक्षरता दर गाठून भारतातील संपूर्ण साक्षरता लक्ष्य गाठणारे पहिले राज्य आहे आणि त्यात स्त्रियाचे साक्षरतेचे प्रमाण हे ९२.१% इतके आहेह्याविषयी आपण कायम वाचतोच. केरळमधील स्त्रियांचा दर्जा हा इतर पितृसत्ताक भागांच्या तुलनेत चांगला आहे असेही दिसून येते. मानव विकास निर्देशकांच्या बाबतीत केरळची आकडेवारी चांगली असल्याने तिथे स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण, एकूण आयुर्मान आणि लिंग गुणोत्तर हे स्त्रियांसाठी अनुकूल असलेले दिसते.परंतु श्रमाच्या क्षेत्रातील स्त्रियांचे प्रमाण पहिले तर ते खूपच कमी असलेले दिसते ज्यातून शिक्षण आणि श्रमातील सहभाग ह्यातील गुंतागुंतच अधोरेखित होते.

केरळ मधिल शैक्षणिक संस्था:

केरळ मध्ये एकूण १४ विद्यापीठ आहेत – केरळ विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ, कॅलिकट विद्यापीठ आणि कुन्नूर विद्यापीठ ही वेगवेगळे शिक्षण देणारी विद्यापीठे आहेत त्याच बरोबर काही विशेष शिक्षण देणारी विद्यापीठे पण आहेत. वर नोंदवलेल्या विद्यापीठांमधून २०१९-२० ला एकूण ३.३२ लाख विद्यार्थ्यांनी कला आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता आणि त्यातील २.२५ लाख ( ६७.७%) ह्या स्त्रिया आहेत. ह्या पैकी अनुसूचित जातींमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्यांची संख्याही ४२,४८६ (१२.७९%) इतकी आहे. त्याच प्रमाणे ह्या पैकी अनुसूचित जमातीमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्यांची संख्याही७,३११ (२.२%) इतकी आहे (स्त्रोत: केरळ विकास अहवाल २०२१). येथे मी फक्त कला आणि विज्ञान शाखेच्या संदर्भातील आकडेवारी घेत आहे कारण त्यातून केरळच्या उच्च शिक्षणाविषयीचे व्यापक चित्र बघायला मिळते. अनुसूचित जाती आणि जमाती ह्यांचे उच्च शिक्षणातील नगण्य सहभाग हा केरळ मध्ये संपूर्ण साक्षरता आहे ह्याच्या गौरवीकरणाला प्रश्नाकीत तर करतेच पण त्याच बरोबर ह्या दाव्याच्या मागील फोलपणा पण दाखवून देते. ह्यात भर म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीतून येणारे विद्यार्थी त्यांची जातीची / जमातीची ओळख सांगत नाहीत कारण त्यांना भीती वाटते की त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे सहकारी त्यांना निट प्रतिसाद देणार नाहीत. अनुसूचित जमाती आणि जातीतून येणाऱ्या मुलांना त्यांच्या आई वडीलांनीच वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळालेला असूनही जावू दिले नाही कारण त्यांना वाटले कि त्यांच्या मुलांना तो अभ्यासक्रम झेपणार नाही. काहीजण बँकेतील नोकरी स्विकारतात. अर्थात ह्यातून उच्च शिक्षणात अनुसूचित जाती आणि जमातीमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे हे तर दिसतेच पण जात वास्तव आणि त्यातून होणारे शोषण ह्यात फार बदल झालेला दिसत नाही.

उच्च शिक्षणात स्त्रिया:

केरळ मधिल शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण ३७% आहे आणि त्यात सर्व अभ्यासक्रमात व्यावसायिक आणि इतर अभ्यासक्रमातही स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेले दिसते. आणि स्त्रिया ह्या पुरुषांच्या तुलनेत जास्त काळ उच्च शिक्षणाच्या अवकाशात असतात हेही दिसून येते. मुलगे हे व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा वगैरे सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना दिसतात ज्यातून त्यांना पुढे नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असलेली दिसते. थोडक्यात पुरुष हेच कुटुंबाचे प्राथमिक कमावणारे असतात हे समीकरण अबाधित राहिलेले दिसते. स्त्रिया ह्या प्रामुख्याने स्वयंपाक, स्वच्छता आणि संगोपन ह्यात सहभागी असलेल्या दिसतात.स्त्रियांच्या शैक्षणिक प्रगतीवर जरी भर दिला गेला असला तरी स्त्रियांची प्राथमिक भूमिकाही बायको, आई आणि संगोपक म्हणूनच बघितली जाते. शिक्षण हे लग्न पुढे ढकलण्यासाठी / नकरण्यासाठीची पळवाट म्हणून पहिले जाते.

केरळ मधील स्त्रियांचे शिक्षण हे सामाजिक विकासाच्या संदर्भात चांगला निर्देशक म्हणून पुढे येते आणि ते कुटुंब, समज आणि राज्य संस्था ह्यांच्या चांगल्यासाठीच त्याचा कसा उपयोग होतो हेही मांडले जाते. शिक्षण घेणाऱ्या बहुतांश मुलीह्या शिक्षण घेवून केरळमधून बाहेर पडून नोकरी करण्याचा विचार करत आहेत असे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले लग्नाचा विचार त्या करताना दिसत नाहीत. एकूण निरीक्षणातून असे दिसून येतेकी समज हा स्त्रियांवर आदर्श आई,मुलगी , सून होण्यासाठी दबाव आणतच असतो. मुलांना आणि मुलीना घरात आणि कुटुंबात वेगळी वागणूक दिली जाते. मुलीना आई वडीलांनी महाविद्यालयात सोडणे किंवा मैत्रिणीनकडे जाताना भावाला तिच्या बरोबर पाठवणे ह्यातून स्त्रियांवर बंधने असल्याचे लक्षात येते. स्त्रियांवर सातत्याने पारंपारिक बंधने पाळण्यासाठीही दबाव असतो हे जाणवते त्यामुळेच वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय गटातूनही स्त्रिया ह्या सक्रिय असल्या तरी त्या महत्वाच्या पदावर असलेल्या दिसत नाहीत. केरळमधील स्त्रिया ह्या प्रामुख्याने कला साहित्य ह्या शाखांमध्ये अधिक दिसतात आणि प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि चांगले बालसंगोपन ह्या विषयी शिकताना दिसतात.

थोडक्यात सांख्यिक आणि गुणवत्तात्त्मक आकडेवारी ही जरी चांगली असली तरी त्यातून कुटुंब, समुदाय किंवा कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा दर्ज्या मध्ये उन्नती झाली आहे असे दिसत नाही. कारण जर असे झाले असते तर केरळ मधिल स्त्रियांच्या कामातील सहभागाचे चित्र अधिक चांगले असते. श्रम शक्ती विषयक अधिकृत सर्वेक्षणातून हे स्पष्ट होते की केरळ मधिल स्त्रियांचा श्रमातील सहभाग हा भारतातील सरासरीपेक्षा कमी आहे, प्रामुख्याने ग्रामीण भागात हे प्रमाण आणखी कमी दिसते कारण स्त्रियांच्या श्रमाची मोजदाद / नोंदणी होत नाही. अशा प्रकारचे स्त्रियांच्या कामाच्या अदृश्यकरणातून केरळ मधिल पितृसत्ताकताच दिसून येते. सरकारी नोकरीच्या पर्यायाला पहीली पसंती दिली जाणे आणि एवढी कौशल्य असणारी लोक असूनही उद्योजकता विकासा साठी अनुकूल वातावरणमात्र दिसत नाही ह्यामुळे विकासाची प्रक्रिया आणि धोरणे हेच प्रश्नाकीत होतात.

सदर संशोधन प्रकल्पातून हे लक्षात आले की कोविड काळात तर उच्च शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांना घर काम आणि शिक्षण दोन्हीचा मेळ घालणे अवघड गेले प्रामुख्याने त्यांना अभ्यास / संशोधन ह्या साठी लागणारा वेळ आणि अवकाश मिळणे अवघड होत होते. ह्या सगळ्याचा त्यांच्या शिक्षण आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला दिसतो.

केरळ मधिल विसंगतीणे भरलेले वास्तव:

केरळ मधील स्त्रियांना जरी शिक्षणा पासून वंचित ठेवले जात नसले तरी त्यांना त्यात यश मिळवण्यासाठीच्या मार्गात खूप अडसर आहेत. शिक्षण घेतल्यावर त्यांना सांस्कृतिक बंधने / चाली रीती ह्यातून सुटका मिळत नाही आणि शिक्षणा बरोबर येणारी मुक्ती/स्वातंत्र्य त्यांना मिळत नाही. त्यांच्या प्रगतीमध्ये सांस्कृतिक प्रथा परंपरा ह्या अडचणी निर्माण करतात आणि त्यांची आर्थिक उन्नती मुळे पुरुषांच्या सत्तेला आणि कुटुंबातील प्राथमिक कमावती व्यक्ती म्हणून असलेल्या प्रतिमेला धक्का बसेल की काय अशी भितीही वाटते. स्त्रियांना जरी दुय्यम नागरिक म्हणून वागवले जात असले तरी स्त्रियांच्या आर्थिक स्वायत्तत्तेतून त्यांचे अवलंबित्व कमी होवून त्यांना स्वतः निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अंदाज येईल अशी धास्ती पितृसत्ताक व्यवस्थेला वाटते.

तरुण मुलींना मात्र सार्वजनिक अवकाशात यायचे आहे त्यांना उच्चशिक्षणाच्या अवकाशात मुक्त विहार करायचा आहे. त्यांना मित्र मैत्रिणीन बरोबर मोकळे आकाश बघायचे आहे, रात्री तारे बघायचे आहेत. पण ह्या सगळ्यावर कुटुंब आणि सामाजिक संस्था बंधने आणताना दिसतात.

केरळ मध्ये पुरुषांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी / नोकरी व्यवसायासाच्या संधींसाठी स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे स्त्रिया ह्या एकट्या घरची जवाबदारी पेलताना दिसतात. त्या लहान मुले आणि घरातील वृद्ध ह्यांची काळजी घेताना दिसतात त्यातील काहीजणी नोकरी पण करतात पण त्यामुळे त्यांच्यावर टिका पण केली जाते. आणि मग ही टीका होऊ नये म्हणून स्त्रिया पण आदर्श मल्याळी स्त्री बनण्याचा प्रयत्न करतात. जेंव्हा पितृसत्ताकता ही कुटुंब, समज आणि कामाच्या ठिकाणी इतकी घट्ट रुतलेली आहे तेंव्हा मानव विकास निर्देशकांविषयीची प्रगती ही फक्त विकास आणि आधुनिकता ह्यावरील दावा सांगण्यासाठीच उपयोगी ठरते. आणि ज्यावेळी तरुण स्त्रिया ह्या स्वतःचा निर्णय घेवू पाहतात किंवा त्या स्वातंत्र्य उपभोगण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यांना नावे ठेवली जातात. ज्या स्त्रिया ह्या स्वतःची स्त्रीवादी म्हणून ओळख सांगतात त्यांना ‘फेमीनाची’ अशा नकारत्मक नावाने हिणवले जाते.

थोडक्यात विकासाच्या निर्देशकांकडे लक्ष देत असताना उच्च शिक्षणातील एकूण लिंगभाव असमानता आणि प्रामुख्याने केरळ मधिल लिंगभाव आणि उच्च शिक्षणाचे वास्तव पाहिल्यास असे लक्षात येते की आर्थिक आणि मानव विकास निर्देशकान बरोबरच एकूण पितृसत्ताक संस्कृती आणि विचारप्रणाली ह्यात बदल होणे गरजेचे आहे. मला असे म्हणायचे आहे की समज व्यवस्थेतील पितृसत्ताक संकल्पना जी स्थळ आणि काळ सापेक्ष आहे त्यामुळे केरळ मधिल विकासातील विसंगती समजून घेण्यास पितृसत्ताकता ह्या संकल्पनेची मदत होईल. सुरुवातीला मी कुटुंबातील व्यवस्थापनेचा जो उल्लेख केला त्यातून समाजची रचनाच अशी आहे की ते करूनच स्त्री स्वतःचे काम चालू ठेवू शकते हे वास्तव लक्षात येते. तरुण मुली / स्त्रिया ह्यांच्यातील गुणवत्ता आणि शिक्षणात आणि कामात काही तरी मिळवून दाखवण्याची जिद्द आणि कोणत्याही दाबावा शिवायचे आयुष्य जगण्याची दुर्दम्य इच्छा ह्यांनी मला हा लेख लिहण्यास प्रेरित केले.

सिनु सुगथन
संशोधक,
स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

This article was first published in the Marathi fortnightly Parivartanacha Watsaru under the Savitrichi Paana article series.