January 16th to 31st, 2022

उच्च शिक्षणातील लिंगभा वात्मक समानता ही संख्यात्मक समतेच्या पलीकडची आहे : कुलगुरू सोनझरिया मिंझ ह्यांच्याशी संवाद.

डिसेंबर महिन्याच्या सकाळी सिदो कान्हो मुर्मू विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर प्रा.सोनझरिया मिंझ ह्या झूमच्या विंडो मध्ये दिसल्या त्यांच्या कामाला अजून सुरुवात व्हायची होती, त्या विद्यापीठाच्या कामात व्यस्त होत्या तरीही त्यानी आम्हाला वेळ दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ब्रुनेल विद्यापीठ, लंडन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने, उच्च शिक्षणाच्या अवकाशात लिंगभावाच्या संदर्भात उपलब्धता, विद्यापीठ आवारातील अभ्यास आणि ज्ञानाच्या वाढीसाठीचे वातावरण, आणि विद्यार्थ्यांचा समावेश आणि त्यांचा तिथे टिकाव लागणे ह्यावर एक संशोधन प्रकल्प ब्रिटीश काउन्सिलने अनुदानातून राबवत आहेत. ह्या अभ्यासासाठी भारतातील पाच राज्यातील दहा संस्थांमधून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रा. मिंझ ह्यांची मुलाखत ही ह्या प्रकल्पाचा एक भाग आहे. त्यांच्या मुलाखतीतून त्यांची उच्च शिक्षणात असलेली लिंगभाव समानते विषयीची कल्पना आणि त्यानी तिथे नेतृत्व स्थानी असणे ह्याचे काय महत्व आहे हे ह्या लेखात अधोरेखित केले आहे

मागच्या वर्षीच प्रा. सोन्झरिया मिंझ ह्यांची कुलगुरुपदी निवड झाली. त्या आदिवासी समाजातून आलेल्या पहिल्या स्त्री कुलगुरू आहेत त्यामुळे त्यांच्या नियुक्तीला ऐतिहासिक महत्व आहे. भारताच्या उच्च शिक्षण सर्वेक्षणातून हे पुढे आले आहे की भारतातील एकूण शिक्षकांपैकी फक्त २.४% इतकेच आदिवासी समाजातून येतात जेंव्हा की संपूर्ण लोकसंख्येत आदिवासींचे प्रमाण हे ८ % आहे. ह्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड ही खूपच महत्वाची आहे.

प्रा. मिंझ ह्यांची ज्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली आहे त्या विद्यापीठाचा इतिहास जाणून घेणेही महत्वाचे आहे. सिदो कान्हो मुर्मू विद्यापीठ हे एम. टी. भागलपूर विद्यापीठ (बिहार) मधून १९९२ मध्ये वेगळे झाले. ते सध्या दुमका, झारखंड येथे स्थित आहे आणि संथाल परंगणा च्या सहा जिल्ह्यात त्याच्याशी सलंग्न महाविद्यालये आहेत. संथाल परंगणाच्या भौगोलिक सीमारेषांची इतिहासात अनेकदा पुनर्रआखणी झाली ज्याची पाळेमुळेही जमीन हक्क, संस्कृती,वांशिकता ह्या संदर्भातील उद्रेकात दिसून येतात. आणि दुमका प्रभागाला संथाल परंगणा पासून वेगळे काढून बघता येणार नाही. सिदो आणि कान्हो ह्या १८५५ च्या संथाल उठावात सहभागी असलेल्या दोन भावांचे नाव विद्यापीठाला देवून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. संथाल परंगणा हा नैसर्गिक स्त्रोतानी संपन्न असा प्रदेश आहे. २०११ च्या खानेसुमारीनुसार दुमका मध्ये ४३% आदिवासी आहेत आणि त्यातील ९३% हे ग्रामीण भागात राहतात. ह्या पार्श्वभूमीवर प्रा. मिंझ ह्यांची मुलाखत महत्वाची आहे त्यांच्या बोलण्यातही तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती आणि त्यांचे भविष्य घडवण्याची जवाबदारी त्या मानतात हे दिसून येते.

समता, समानता आणि समवेश

प्रा. मिंझ ह्या लिंगभाव समता आणि लिंगभाव समानता ह्यातील फरक अधोरेखित करून नेतृत्वस्थानी असणार्यांनी समानतेच्या विचारा मध्ये जवाबदारी, उत्तरदायित्व आणि त्या विषयी आवाज उठवणे ह्याचा समावेश असतो ह्याचे भान ठेवणे कसे गरजेचे आहे असे मांडतात कारण ज्यावेळी आपण फक्त समता म्हणतो त्यावेळी त्यात खूपदा फक्त संख्यात्मक माहितीचा समावेश होतो.

झारखंड मध्ये शिक्षणासंदर्भातील एकूण चित्र पहिले तर एक प्रकारची समता असलेली दिसते. अर्थात ह्याचे जर खोलात जावून परिक्षण केले तर हे लक्षात येते की ही समता ही वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधल्या स्त्रियांच्या संख्येतून प्रतिबिंबित होताना दिसत नाही. सिदो कान्हो विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबधीची आकडेवारी बघितली तर हे लक्षात येते की खूप कमी मुली ह्या विज्ञान शाखांमधून प्रवेश घेतात आणि त्याहून कमी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतात हे प्रा. मिंझ लक्षात आणून देतात. हे ही शक्य आहे की विज्ञान शाखा निवडणार्या मुली ह्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा संस्थे विषयीच्या पूर्वग्रहामुळे राज्या बाहेर जाण्याचा निर्णय घेत असतील. स्त्रियांसाठी नाही अशा मानल्या जाणार्या क्षेत्रात ज्यावेळी स्त्रिया दिसतात त्या वेळी त्याकडे लक्ष वेधले जाते परंतु ज्या शाखांमध्ये स्त्रियाचे प्रमाण कमी आहे त्या विषयी मात्र बोलले जात नाही. शिक्षिक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये असलेली लिंगभाव समतते चित्र हेही दयनीयच आहे. प्रा. मिंझ ह्यांनी हेही नोंदवले की महावीद्यालायान मध्ये सुद्धा स्त्रिया ह्या कनिष्ठ पदावर काम करताना दिसतात. शिक्षक कर्मचार्यान मध्ये सुद्धा ज्या प्राध्यापक बनतात किंवा प्रमुख पदावर जातात अशा स्त्रियांचे प्रमाण खूप कमी असते. स्त्रियांना शाळेत शिकवण्यास उद्युक्त करण्यात येते पण त्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात प्राध्यापक म्हणून खूप कमी आहेत. त्यांचा प्रश्न आहे की हे कशा मुळे घडते ह्याचा विचार आपण करणे गरजेचे आहे.

लिंगभाव समानतेचा संबध जवाबदारी, उत्तरदायीत्व आणि नितृत्वाशी जोडताना त्या नोंदवतात की स्त्रियांची संख्याहीच मुळात कमी असल्याने त्यांना महत्वाच्या जवाबदार्या असणारी पदे किंवा नेतृत्व स्थान देण्याच्या शक्यता कमी होत जातात.

प्रा. मिंझ ह्यांच्या मते त्यांच्या विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयात एक विस्तृत असा लिंगभाव संवेदनक्षमता वाढवण्याचा व्यापक कार्यक्रम आखण्याची गरज आहे. स्त्रियांसाठी समिती किंवा लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी समिती ह्या गरजेच्या आहेत पण पुरेश्या नाहीत. त्यांना वंचित गटातून येणाऱ्या स्त्रियांना त्यांचे शिक्षण घेण्यास सक्षम बनवू शकतील अशा योजना आखायच्या आहेत. ह्यामध्ये पाळणाघर, सुरक्षित वाटण्यासाठी नीट दिवे असलेले रस्ते आणि काळजी घेणार्यांसाठी प्रशासकीय कर्मचार्यांसाठी विद्यापीठ परिसरात राहणायची व्यवस्था करून परिसर आणखी सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर त्यानी पीच. डी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांना शून्य सत्र जाहीर करून त्यांना मुल जन्माला घालण्यासाठी आणि नवजात बाळाचे संगोपन करण्यासाठी वेळ उपलब्ध तर करून दिलाच पण त्याच बरोबर त्यांना त्यांचा सन्मान पण दिला. शून्य सत्र ह्या कल्पनेमुळे ‘एक पेपर राहिला’ किंवा एका पेपर मध्ये नापास झालो अशी नकारात्मक अर्थ असणार्या कल्पनांना पर्याय मिळाला. त्या ज्यावेळी मुलींसाठी कोणती वेळ चांगली ह्याचा विचार करत असताना त्या म्हणाल्या की हा विचार हा मुलीना वर्ग / व्याख्यानाना उपस्थित राहता येणे ह्यासाठी महत्वाचा आहे.

रोजगाराचा विचार करत असताना प्रा. मिंझ ह्या शिष्यवृत्ती, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रशीक्षण असा एकत्रित विचार असणे कसे गरजेचे आहे हे मांडतात. आणि विद्यार्थ्यांची नोकरीसाठी आवश्यक असणारी कौशल्य वीकासीत होणे कसे गरजेचे आहे आणि त्याशिवाय त्यांच्या मते नुसते नोकरी मिळवून देण्यासाठी ज्याला प्लेसमेंट सेल असे म्हणाले जाते त्याचा उपयोग नाही. विद्यार्थी प्रशिक्षणातून त्यांचे संभाव्य नोकरी देवू करणारे कोण असू शकतील हे ओळखण्याचे कौशल्य विकसित होण्याच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि ह्या बरोबरच ज्या संस्था किंवा आस्थापने ही लिंगभाव संवेदनक्षम आहेत त्यांना मुलीना नियुक्त करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. ह्या मध्ये स्त्रिया आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष वर्गांचा समावेशही असला पाहिजे असे त्या नोंदवतात.

प्रा. मिंझ सांगतात की त्यांच्या वयक्तिक आणि शैक्षणिक प्रवासात त्यांना ‘न्याय’ ह्याच्या लिंगभावात्मक न्याय, सामाजिक न्याय आणि नैसर्गिक न्याय ह्या तीन संज्ञांनी मार्गदर्शन केले. ह्याची प्रचिती त्यानी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय समिती, कार्यदल / कृती समिती ह्यावर वंचित / परिघावरील घटकांतील स्त्रियांची जी नियुक्ती केली त्यातून दिसून येते.

त्यांच्या नेतृत्वाचे महत्व

प्रा. मिंझ ह्यांनी हाती घेतलेले उपक्रम आणि त्यांची त्यामागची वैचारिक दृष्टी पाहिल्यास हे नक्कीच लक्षात येते के त्या विद्यापीठा कडे एक रिकामी इमारत किंवा १० ते ५ काम करणारी कचेरी म्हणून पाहात नाहीत. सीदो कान्हो विद्यापीठात आल्यानंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींची सरासरी नोंदणी मधील समता हा ह्या प्रभागाचा प्रश्न नसून मुलींसाठी शैक्षणिक आवार हे अधिक सुरक्षित आणि निकोप कसे बनवता येईल ह्यावर त्यानी भर दिला. त्यांच्या समोरचा विद्यापीठ परिसर म्हणजे असा परिसर आहे जो सगळ्यांसाठी उपलब्ध आणि आवाक्यातला असेल आणि तो सतत विद्यार्थ्यानी भरलेला असेल.

त्यांच्या वयक्तिक प्रवासा बद्दल बोलताना प्रा. मिंझ ह्यांनी आवर्जून सांगितले की कसे त्यांच्या आई वडीलानी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना त्यांच्या समुदायाविषयी भान पण दिले. त्यांच्या आई वडीलांचे एक वाक्य त्या आठवून सांगतात की आपण आपल्या दैनदिन गरजा भागवण्यासाठी जे काम करू ते आहेच पण ते पुरेसे नाही. त्यामुळे त्यांच्या कुलगुरू असण्या विषयी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना काय वाटते हे विचारल्यावर त्या म्हणाल्या की हे अनेकांना प्रोत्साहित करणारे आहे पण म्हणून अशा प्रमुखप्रवाहीकरणातून आपण आपले वेगळेपण हरवता कामा नाही. आणि तरीही परिघावरुन असे आदर्श दिसले पाहिजेत त्यांचे आवाज एकू गेले पाहिजेत. तरुण मुलीनी जर असे आदर्श जवळून बघितले तर ते त्यांना अधिक प्रोत्साहित करतील. त्या हे ही म्हणतात की ह्या अशा व्यक्ती / उदाहरणे ह्यांची ओळख होणे ह्याचा सामाजिक अर्थाने विचार केला तर ते म्हणजे यश किंवा काहीतरी मिळवणे नाही पण आपल्याला ह्यचीही कल्पना नाही की ह्याचा अर्थ बघणारे कसा लावतात कदाचित विद्यार्थी ह्यातून काही तरी प्रेरणा घेतील काहीतरी साध्य करायचा प्रयत्न करतील.

प्रा. मिंझ म्हणतात की त्यांचे स्वप्न फक्त त्यांच्या मुलांसाठीचे नाही तर त्यांच्या नातवंडांनसाठी पण आहेत. त्यां त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगतात पण की जर मी कुलगुरू होऊ शकते तर तुम्ही पण होऊ शकता. त्यांची कुलगुरू पदावरील नियुक्ती ही उच्च शिक्षणाचे लोकशाही अवकाश काय खुले करू शकते हे स्पष्ट करते. त्यांची नियुक्ती ही जशी त्यांच्या वयक्तिक यशाचे द्योतक आहे तसेच हे आत्तापर्यंत झालेले ऐतिहासिक आणि एकत्रित येवून केलेल्या संघर्षाचे पण प्रतीक आहे.

शेवटी त्या म्हणल्या की साक्षरता ही वर्गात घडते पण शिक्षण हे वर्गा पुरते मर्यादित नसते. आणि म्हणूनच विषयवार शिक्षणावर भर नदेता समग्र शिक्षणा वर भर दिला पाहिजे. त्या म्हणल्या की मी सध्या घर बदलत आहे मी आता विद्यापीठ परिसरात राहयला येणार आहे. आणि त्यानी आनंदाने सांगितले की मी आज माझ्या सहकार्यांना सांगितले आहे की मी आज रात्री विद्यापीठात झोपणार आहे. त्यांचे शिक्षणा वरच्या विचारातून आणि न्याया विषयीची त्यांची वचनबद्धता ही त्यांच्या उच्च शिक्षणातील समकालीन कळीच्या मुद्यांविषयी भाष्य करते.

आनंदिता घोष
संशोधक,
स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

This article was first published in the Marathi fortnightly Parivartanacha Watsaru under the Savitrichi Paana article series.