April 16th to 30th, 2022

निळ्या डोळ्याची मुलगी वाचताना…

“निळ्या डोळ्यांची मुलगी” ही शिल्पा कांबळे ह्यांची पहिली कांदबरी २०१४ साली गोदा प्रकाशन औरंगाबाद ह्यांनी प्रकाशित केली आहे आणि त्यांचे बिर्याणी हे नाटकही खूप गाजलेलं आहे. सदरील कादंबरी माझ्या वाचनात आल्यानंतर मला अनेक प्रश्न पडले कारण कथेतील बहुतांश पात्रे मी माझ्या आजूबाजूला रोज पाहत आलेली आहे. शिक्षणासाठी अनेकांना संघर्ष करावा लागतो, अडचणी तसेच भेदभाव यांचा सामनाही करावा लागतो. सदरील संघर्ष हा प्रत्येकासाठी सारखाच नसतो त्यामध्ये आपल्याला काळानुसार बदल झालेले दिसून येतो. जो ह्या कादंबरीमध्ये उत्तम पद्धतीने मांडला आहे आणि पत्ररुपाचा वापर केलेला आहे. कादंबरीमध्ये खालच्या जातीतील असल्यामुळे दैनदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी म्हणजे पाण्याचा प्रश्न, राहत्या घराचा प्रश्न, बुवाबाजीच्या आहारी जाणे, शिक्षणाचा अभाव ह्या आणि अशा अनेक समस्यांबाबत मांडणी यामध्ये येते. झोपडपट्टीमध्ये राहताना सार्वजनिक संडासाचा प्रश्न म्हणून लिखाण न करता उल्का ‘सार्वजनिक संडासाचे आत्मवृत्त’ कादंबरीमध्ये केलेले आहे. समाजामध्ये प्रत्येकाला समस्या तसेच अडीअडचणी असतात आणि त्या सोडवण्यासाठी काहीजण अंधश्रद्धेकडे वळतात आणि बुवाबाजी करताना दिसून येतात. मीराने उल्काला मोडक महाराजांच्याकडे नेले असता ती त्याकडे आकर्षित झाली असली तरी तिच्यावर त्यांचा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. कादंबरीमध्ये महत्वाचे प्रश्न हे कधी उल्काच्या सुबी म्हणजे तिच्या रोजनिशीतून आपल्याला समजतात, कधी पत्ररूपातून तर काहीवेळेस विविध पात्रांच्या कथेच्या माध्यमातून आपल्याला समजतात.

कादंबरीमधील पत्ररूपही वेगळ्या धाटणीचे आहे कारण उल्काची आई वैजंयताला तिच्या आईने लिहिलेले पत्र ही त्यांची जगण्याची धडपड तसेच त्यांचा सामाजिक संदर्भ ही मांडतात. उल्काचे तिच्या मैत्रिणींशी असलेले नातेसंबंध त्यांच्या पत्रातून समजत असले तरी त्यातून आपल्याला अनेक सामाजिक प्रश्नांची देखील माहिती मिळते. मीरा आणि उल्का यांच्या पत्रामध्ये उल्काचा शैक्षणिक प्रगती तसेच तिचा विकासही समजतो. समाजामध्ये एखादी संघटना अथवा समूह हा कार्यरत असल्यामुळे होणाऱ्या नवीन बदलांची जाणीवही आपल्याला होते. समाजामध्ये प्रत्येकाला आर्थिक तसेच सांस्कृतिक भांडवल नसते. विशेषतः झोपडपट्टीमध्ये राहून शिक्षण घेताना अडचणी येतात आणि त्या सोडवण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलावी लागतात. कांदबरीमध्ये ‘आक्रोश’ ही युवा संघटना याकडे आपले लक्ष वेधते. अशाप्रकारच्या संघटना समाजामध्ये कार्यरत झाल्यामुळे नवीन पिढीला सक्षम करण्यामध्ये त्या महत्वाचे योगदान देतात.

घरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला असलेला उत्साह लहानपणापासूनच माझ्या मनात तेज निर्माण करणारा होता. शाळेमध्ये असताना मला समजले की, डॉ. आंबेडकर ह्यांनी किती विविध विषयांवर अभ्यास केलेला आहे आणि त्यांना त्यामध्ये अनेक पदव्याही मिळालेल्या आहेत. समाजामध्ये त्यांची जी संविधानाचे शिल्पकार म्हणून प्रचलीत असलेल्या ओळखीपेक्षा त्यांची वेगळी होती. त्यांची शिक्षणातील असलेले स्थान आणि त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील योगदान हे मला हळूहळू समजत गेले. त्यातूनच माझ्यामध्ये शिक्षणाबाबतची ओढ अथवा आवड निर्माण झाली असे, मला वाटते.

माझ्या शैक्षणिक प्रवासात मला एका खाजगी संस्थेकडून आर्थिक मदत मिळाली होती तिथे महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षणामध्ये असलेले विविध पर्याय तसेच त्यासाठी असलेल्या प्रवेश परिक्षांबाबत मला मार्गदर्शन मिळाले. यामध्ये मला विविध शाखेतील विद्यार्थी भेटले ज्यातील काहीजण स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते तर काहीजण हे संशोधन ही करत होते. इथेच मला पी.एचडीच्या अगोदर एम. फील. ही संशोधनाची पदवी असल्याचे समजले. उच्च शिक्षणाचा आवाका हा खूप मोठा आहे त्यामध्ये असलेले विविध पैलू आपल्याला समजणे सहज शक्य होत नाही. मला उच्च शिक्षणाबाबत मिळालेली माहिती ही खूप नंतरच्या टप्प्याला मिळाली. सदरील माहितीचे ज्ञान अथवा त्याबाबतची कल्पना ही काही जणांना आधीपासूनच असते, हे मी एम. फील. ला प्रवेश घेतल्यावर मला समजले. माझे पदवी तसेच पदवीत्युत्तर पदवीचे शिक्षण हे मी नोकरी करत असताना घेतले. सदरील काळ हा माझ्यासाठी खूप सारे आव्हाने देणारा होताच पण त्याचबरोबर शिक्षणामध्ये गोडी वाढवणारा होता. नोकरी करत असताना आपण महाविद्यालयातील प्रकल्पांमध्ये भाग घेणे, वाचन पूर्ण करणे तसेच अनेक अभ्यासाला पूरक गोष्टी करताना नेहमीच मला वेळेचा अभाव जाणवत असे. मला नेहमी वाटायचे की, मी पूर्णवेळ शिक्षण करावे आणि एका जागी बसून पुस्तके वाचत मी माझ्या ज्ञानामध्ये भर घालावी. घरातली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे नोकरी सोडणे शक्य नव्हते. मला माझ्या शैक्षणिक आणि खाजगी आयुष्याच्या अडीअडचणींमध्ये एक नेहमीच चांगले मार्गदर्शक व्यक्ती भेटत गेल्या ज्यांनी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली आणि माझ्या शैक्षणिक प्रवासाला एक योग्य दिशा मिळत गेली आणि माझ्या ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. आता मी माझे एम.फील ही संशोधनातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि एक संशोधन सहाय्यक म्हणून काम करत आहे. संशोधनाकडे वळणे हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा मी मानते. माझ्या अनुभवांचा विचार करत असताना मला उल्काचा शैक्षणिक प्रवासामध्ये तिला आर्थिक मदत करणारी मैत्रीण, भाषेची अडसर तसेच तिचा ‘आक्रोश’ शी आलेला संबंध तिला सामाजिक-सांस्कृतिक भांडवल निर्माण करण्यात मदत करते.

“निळ्या डोळ्यांची मुलगी” ही कादंबरी वाचनात आल्यावर मी माझ्या शैक्षणिक प्रवासाचा वेगळ्याप्रकारे विचार करू लागले. कथेमध्ये येणाऱ्या अनेक पात्रांशी मिळत्या-जुळत्या व्यक्ती मी आजूबाजूला पाहिलेल्या होत्या किंवा तशा गोष्टी ह्या ऐकलेल्या होत्या. कांदबरीमध्ये असलेली नायिका उल्का ही मला खूप साऱ्या गोष्टी नव्याने शिकवून गेली. एका बौद्ध मुलीची शाळेपासून ते लग्नापर्यंतची कथा यामध्ये आहे आणि तिच्या या प्रवासामध्ये अनेकजणांच्या कथाही जोडलेल्या आहेत. उल्काच्या वडलांच्या दारूच्या व्यसनामुळे उल्का आणि तिची आई ह्या मुंबईला राहायला येतात. उल्काला ढगेबाई यांनी दिलेले ‘ डायरी ऑफ अनफ्रंक’ हे पुस्तकाने तिला रोजनिशी लिहायची प्रेरणा दिली . तिच्या डायरीला ती ‘सुबी’ हे नावही देते आणि कादंबरीमध्ये आपल्याला तिच्या रोजनिशीची झलकही पाहायला मिळते. सदरील कादंबरीमध्ये उल्काला शिक्षण घेत असताना उच्चवर्णीय शिक्षकांकडून केला जाणारा भेदभाव हा कुठेतरी अनेक प्रश्नांना वाचा फोडतो, असे मला वाटले. उल्का आणि तिच्यासारख्याच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून भेदभावाची वागणूक मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा आलेला दिसतो. मराठी माध्यमातून इंग्रजीमध्ये शास्त्रामध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतानाचा माझाही अनुभव मला आठवला. संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून असल्याकारणाने मला वर्गामध्ये शिकवलेले समजत नसे. या टप्प्यावर खूप सारेजण शिक्षण अर्ध्यावर सोडतात किंवा दुसर काहीतरी शिकतात असे मला दिसले.परंतु उल्का ही आपले शिक्षण पूर्ण करते आणि आपल्या समस्यांवर मात करते आणि इथेच न थांबता ती इंग्रजीमधील अनेक पुस्तके वाचायला लागते.

कांदबरीमध्ये येणारी प्रत्येक पात्रे ही वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांची मांडणी करतात. ज्यामध्ये जात वास्तवासोबतच रोजच्या जेवणासाठी केला जाणारा संघर्ष ही आहे. शिक्षण हे प्रत्येकासाठी मुलभूत गरजे इतकेच महत्वाचे असले तरी प्रत्येकाला शिक्षण पूर्ण करताच येत नाही. घरातील सदस्यांना शिक्षणाबाबत माहिती नसणे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा बहुतांश जणांचे शिक्षण अर्धवट राहते. हेच आपण आजूबाजूला पाहत असतो परंतु त्याचा गांभीर्याने विचार करत नाही.

माझे शालेय शिक्षण हे सरकारी आणि खाजगी शाळेमध्ये मराठी माध्यमामधून पूर्ण झाले. काही काळ मी शिक्षण हे अर्धवट सोडले होते. काही काळाने मी माझे शिक्षण पुन्हा नव्याने सुरु केले आणि आता स्त्री अभ्यासात संशोधन करत आहे. माझ्या कुटुंबामध्ये उच्च शिक्षण हे पूर्ण करून सध्या संशोधन करणारी घरातील पहिली आहे जिने आपले उच्च शिक्षण पूर्ण केलेले आहे आणि आताही शिक्षण घेत आहे. आताही माझे शिक्षण सुरु आहे हे ऐकल्यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. सदरील प्रश्नांचा विचार केला तर माझ्या लक्षात येते की, माझ्याकडे आर्थिक पाठबळ नव्हते तसेच मला सुरुवातीला उच्च शिक्षणातील संध्यांबाबत माहिती ही नव्हती.

संशोधक म्हणून काम करताना सध्या मी उच्च शिक्षण आणि लिंगभावासंबंधित प्रकल्पावर काम करत आहे त्यामध्ये काम करताना मला उच्च शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी तसेच समस्यांबाबत अभ्यास करत आहे. ज्यामध्ये जात, लिंगभाव तसेच भौगोलिक स्थान हे महत्वाची भूमिका निभावतात, हे मला आत्तापर्यंत केलेल्या संशोधनामधून दिसले. उच्च शिक्षण घेणे हे घेताना येणाऱ्या अडचणी तसेच समस्या ह्या जातवास्तव तसेच आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येकाला वेगवगेळ्या येतात. शिल्पा कांबळे ह्या जात, वर्ग तसेच स्त्री प्रश्नांची मांडणी ही त्यांच्या लेखणातून केली गेलेली आहे. “निळ्या डोळ्यांची मुलगी” ही कादंबरीमध्ये त्यांनी उल्काचा मांडलेला प्रवासामधून खुप साऱ्या गोष्टींचा उहापोह केलेला दिसून येतो.

शिल्पा कांबळे यांचा स्वत:चा प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे आणि समजतील जात, दारिद्रय ह्याचे भीषण वास्तव रेखाटणारे सुद्धा आहे. त्या सध्या एक लेखिका आणि आयकर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मराठी साहित्यामध्ये त्याच्या नावाला महत्व आहे आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेल्या एका मालिकेसाठी लेखनही केलेले आहे. मुंबईमध्ये राहत असताना सर्व प्रकारचा विकास केला तरी जातीय भेदभावाच्या अनुभवांचे कथन हे त्यांच्या लेखनातून येते. उच्च शिक्षणामध्ये समाजातील सगळ्याच घटकांचा समावेश सारखा नाहीये आणि त्यामध्ये आपल्याला कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण हे कमी असल्याचे दिसून येते. उच्च शिक्षण म्हणजे काय? उच्च शिक्षणामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? या प्रश्नाची उत्तरे ही खूपवेळा त्यांच्याकडे नसतात किंवा त्या विषयी अर्धवट माहिती असते. त्यासाठी लागणारे आर्थिक भांडवल तसेच सामाजिक-सांस्कृतिक भांडवलाची कमतरता असल्याची दिसून येते. उच्च शिक्षणासाठी सरकारी तसेच खाजगी स्तरावर अनेक योजना तसेच कार्यक्रम राबवले जात असले तरी त्यांची माहिती ही समाजामध्ये प्रत्येकाला मिळत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्या, फेलोशिप तसेच इतर संबंधित योजनाची माहिती ही सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याकरिता उपाययोजना केल्या पाहिजे.

भाग्यश्री जावळे
संशोधक,
स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

This article was first published in the Marathi fortnightly Parivartanacha Watsaru under the Savitrichi Paana article series.